Wednesday, November 24, 2010

मित्र

हेमंत करकरे गेल्यामुळे समाज म्हणून आपले नेमके काय नुकसान झाले आहे ते कळायला खूप वेळ लागेल. अनेकांना कदाचित ते कधीच कळणार नाही. कारण हडेलप्पीकरता प्रसिध्द असलेल्या पोलीस खात्यातील अश्या अधिका-यांचे नेमके वेगळेपण कशात असते, त्यांची वैशिष्ट्य काय असतात, त्याचा समाजाला नेमका उपयोग काय हे जाणून घेण्याची, त्याचे कौतूक करण्याची, त्याला उत्तेजन देण्याची संवेदनशीलताच आपल्यातले अनेक जण त्यांच्या स्वभाववैशिष्ट्यांमुळे वा राजकारणामुळे हरवून बसले आहेत.

आणि ही संवेदनलशीलताच करक-यांनी विविध पातळ्यांवर, अगदी पोलीस अधिकारी म्हणूनही, नेमकी आयुष्यभर कायम जपून ठेवली होती. मालेगाव स्फोटांच्या तपासामुळे त्यांच्यावर आणि त्यांच्या सहका-यांवर जी राळ उठवण्यात आली त्यांनी ते व्यथित झाले होते. पण तरीही त्याबद्दल बोलताना अगदी खाजगीतही त्यांच्या तोंडातून कुणाबद्दलही उणा वा वावगा शब्द कधी आला नाही. त्यांच्या मृत्यूपूर्वी आधीच्या शनिवारी रात्री ते माझ्या घरी गप्पा मारायला आणि जेवायला आले होते. पण तेव्हाही त्यांच्यातील ही सभ्यता आणि सुसंस्कृतता प्रकर्षाने जाणवली. जशी ती आमच्या संबंधात गेली २० वर्षे मला सतत जाणवत आली आहे.

१९८७ ला मी टाइम्स ऑफ इंडियाकरता वार्ताहर म्हणून ठाणे जिल्हा कव्हर करण्याकरता म्हणून गेलो. त्यानंतर काही महिन्यांनी करकरे बदलून ठाण्यात आले. त्यांचा माझी पहिली भेट झाली ती आयुक्त वाध्वा यांच्या कार्यालयात. कळव्यात काहीतरी पोलीस बळजबरीचे एक प्रकरण झाले होते आणि त्याची माहिती घ्यायला मी त्यांच्याकडे गेलो होतो. त्यांनी माझी करक-यांशी ओळख करून दिली आणि म्हणाले, ही इज यूअर न्यू डीसीपी. आस्क हीम. करक-यांनी मला नंतर त्यांच्या कार्यालयात भेटायला सांगीतले.

काहीश्या अनिच्छेने ते मला केवळ आयुक्तांच्या सांगण्यावरून भेटले. परत भेटायचे नाही हे मनाशी ठरवत. हे पुढे त्यांनीच मला एकदा चांगली मैत्री झाल्यावर सांगीतले. आधीच्या ठिकाणी आलेल्या काही अनुभवांमुळे पत्रकारांशी संबंध ठेवायचा नाही असे त्यांनी ठरवले होते. पण त्यांच्या पदामुळे आणि घडणा-या घटनांनुळे त्यांना ते शक्य झाले नाही. परंतु ठाण्यातील अनुभवांनंतर त्यांनी आपले मतही बदलले.

एका खुनाच्या प्रकरणात काही माहिती देण्याकरता ऑफिस दिवाळीकरता बंद असल्याने त्यांनी मला घरी बोलावले. तेव्हापासून आम्ही जवळ आलो आणि बघता बघता कसे मित्र झालो ते कळलेच नाही. (आनंद नाडकर्णीने म्हटल्याप्रमाणे इतके मित्र होऊनही आम्ही कायम अहो जाहोवरच राहीलो, अरे तुरेवर कधीच आलो नाही हे आता जाणवते आहे. त्याचे श्रेयही त्यांच्याकडेच आहे. त्यांच्यापेक्षा मी वयाने, पदाने लहान असूनही त्यांच्या तोंडात माझ्याबद्दल कधीच अरे तुरे आले नाही. अगदी माझ्या पत्नीशी बोलतानाही ते अहोजाहो करत.)

पोलीस असूनही एकूणच वागण्यात सभ्यता आणि सुसंस्कृतता इतकी की आपण चक्रावून जावे आणि मार्दव इतके की आपण त्यांच्या व्यक्तीमत्वाच्या प्रेमातच पडावे. ते कायम अतिशय हळू आवाजात शांतपणे बोलत. कोणत्याही अर्ग्युमेंटमध्ये कधीच त्यांचा आवाज वर गेलेला मी बघितला नाही (फक्त आरोपींशी बोलताना सोडून). फारच एखादा मुद्दा पटला नाही तर, तुम्ही असे कसे म्हणता, यापलीकडे त्यांचे शब्द कधी जात नसत. मला तर वाटते की मी त्यांच्याशी वाद घालताना ते आपले मित्र आहेत म्हणून खूपच स्वातंत्र्य घेत असे. पोलीस खाते, आयपीएस अधिकारी यांच्याबद्दलची माझी मते जणू काही तेच या सगळ्याला जबाबदार आहेत अश्या पध्दतीने अरेरावीने मांडत असे. पण त्यांचा कधीच तोल जात नसे, आवाज चढत नसे. ते सभ्यपणे माझे काही मुद्दे मान्य करत. काही बाबतीत त्यांचे मते मांडत. पण वादविवादातील सभ्यपणा सोडत नसत.

त्यांच्या निस्पृहपणाबद्दल खूप लिहून आले आहे. खरोखरच हे वैशिष्ट्य सध्या सरकारी अधिका-यांमध्ये दुर्मिळ झाले असल्याने त्याचे कौतूक होणे स्वाभाविक आहे. त्यांच्या धैर्याबद्दल तर आता बोलायलाच नको. बलीदान करूनच त्यांनी ते सिध्द केले आहे. पण त्याहीपलीकडे जाऊन त्यांच्यात अनेक गुण होते, एक पोलीस अधिकारी म्हणून आणि माणूस म्हणूनही. विविध प्रकारच्या माणसांना आपल्याकडे आकर्षित करण्याची एक कला त्यांच्याकडे होती. तरत-हेची अशी अनेक माणसे त्यांनी आपल्याभोवती जमवली होती. अर्थात असे असले तरी आपल्या पदामुळे या बाबतीत ते खूप जागृतही असत. कोणीही नवीन माणूस संबंधात आला की ते आमच्यासारख्या मित्रांकडे तो कसा आहे याबद्दल चौकश्या करत आणि खात्री पटली की मगच त्याला त्याला आपल्या मित्रपरीवारात सामील करत. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अंत्यदर्शनाला वा त्यांच्या कुटुंबीयांच्या सांत्वनाकरता विविध क्षेत्रातील जी प्रचंड संख्येने जी माणसे आले होती ते बघितल्यावर त्यांनी नेमके काय कमावले होते त्याची कल्पना येते.

अनेक नवनविन गोष्टींबद्दल कुतुहल, त्या करून बघण्याची इच्छा हे करक-यांचे दुसरे वैशिष्ट्य. आणि आपल्या प्रचंड कामाच्या रगाड्यातही ते या सगळ्याकरता वेळ काढत. एकदा माझ्यासमोर आणि माझ्या एका मित्रासमोर एक भव्य डिपार्टमेंट स्टोअर सुरू करण्याची कल्पना मांडली. अर्थात त्यांच्या अश्या सर्व भव्य योजनांसमोर आम्ही मित्रच खुजे ठरायचो आणि आम्हाला काही जमायचे नाही. आमच्या अश्या भव्य भव्य योजनांवरील चर्चांमुळे आमच्या दोघांच्याही बायका काहीवेळा आमची गंमतही करत. पण त्यांचा उत्साह कमी होत नसे. नवनव्या गोष्टींमधला रस इतका की जाहीरात एजन्सी चालवणा-या माझ्या एका मित्राला एका जीन्सच्या आणि विडीच्या जाहीरातीचे काम मिळाल्यावर जणू काही ती आपलीच एजन्सी आहे आणि आपल्यालाच काम मिळाले आहे अश्या प्रकारे त्या कँपेनवर ब्रेन स्टॉर्मिंग करण्याकरता त्यांनी एक अख्या रात्रीचे सेशनही आयोजित केले आणि त्यात उत्साहाने भाग घेतला, कल्पना सुचवल्या. त्यातील त्यांचा रस म्हणजे यानिमित्ताने काहीतरी क्रिएटीव विचार करायला मिळतो. एकाच वेळी अनेक गोष्टीत संचार करण्याची आपली मनापासूनची इच्छा ते मला वाटते या पध्दतीने त्या त्या लोकांमध्ये मिसळून, त्यांच्या कामात रस घेऊन, चर्चेत भाग घेऊन भागवीत असत. चंद्रपूरला असताना चित्रकार, व्यंगचित्रकार मनोहर सप्रे यांच्यापासून प्रेरणा घेऊन त्यांनी बनवलेली उत्कृष्ट काष्टशिल्पे त्यांच्यातील कलाकाराची आणि त्यांना अनेक विषयात असलेल्या रूचीची साक्ष आहेत.

नव्यानव्या गोष्टींमधे रस असल्यामुळेच त्यांना अनेकदा पोलीसची नोकरी सोडून देण्याची हुक्की येई. पण ती अवस्था तात्पुरती असे. त्याबाबत ते चर्चा करत आणि ते करत असलेले काम कसे आणि किती महत्वाचे आहे हे त्यांना पटवले की तो विषय बंद होई. पण तरीही आपल्याकडून (नेहमीचे ड्यूटीचे काम सोडून इतर काही) जे आणि जेव्हढे मोठे काम व्हायला हवे तसे होत नाहीये असे वाटून त्यांना मधेमधे डिप्रेस्ड वाटे. सतत उत्साहाने आणि आनंदाने नवनवीन काम करणा-या आपल्या काही सहका-यांचे त्यांना खूप कौतूक होते. सुरेश खोपडे हे त्यापैकी एक. कुठेही गेले, कितीही अन्याय झाला तरी ते खचत नाहीत आणि जेथे जातील तेथे नवीन काहीतरी करतात ह्याचे त्यांना खूप कौतूक होते. (असेच कौतूक त्यांना अनिल अवचट यांचेही वाटे.)

एकूणातच कुठच्याही काहीही छोट्या कर्तृत्वाबद्दल त्यांना कौतूक असे. मुख्य म्हणजे कोणीतरी आपल्या पुढे जाईल अशी भीती त्यांना नसे. याचे एक महत्वाचे कारण म्हणजे अनेक गोष्टीत मनापासून रस घेत असतानाच आपल्या कामावरती असलेली त्यांची पकड. त्याकरता त्यांना खूप वेळ द्यावा लागे आणि काम व छंद यांच्यात समतोल राखताना त्यांची खूपच धावपळ होत असे. परीणामी मित्रांना, परीचितांना आणि घरच्यांनाही दिलेल्या वेळा ते अनेक प्रसंगी पाळू शकत नसत (माझ्याकडे ते नेहमीच सांगीतलेल्या वेळेच्या एक दीड तास उशिरा येत, पण शेवटच्या भेटीच्या वेळी कधी नव्हे ते सांगीतलेल्या वेळेच्या आधी आले होते.). पण तरीही दोन्ही गोष्टी ते मनापासून करत.

आर्थिक गुन्हे विभागाचा कार्यभार संभाळू लागल्यावर एका मोठ्या शेअर ब्रोकरला भेटून त्यांनी एकूणच शेअर्सचा व्यवसाय समजावून घेतला होता. दहशतवाद या विषयावरची काही चांगली पुस्तके त्यांनी गोळा केली होती. मुंबईत उपायुक्त असताना विविध पोलीस ऑफिसेस आणि आयुक्त कार्यालय यांच्यातील टपाल पाठवण्याच्या व्यवस्थेत बदल घडवून आणून त्यांनी या कामात वाया जाणारे मनुष्यबळ वाचवून ते इतर महत्वाच्या कामाकरता उपलब्ध करून दिले होते आणि ते ही तो विषय त्यांचा नसताना, त्यावर विचार करून, त्याकरता वेळ देऊन. जो विषय असेल त्यात खोलवर जायचे, मग त्याकरता कितीही वेळ द्यावा लागला तरी हरकत नाही हा त्यांचा स्वभाव होता. त्यामुळेच जातील दंगली हा विषयही आता केवळ स्थानिक राहीलेला नसून त्याला आंतरराष्ट्रीय संदर्भ कसा आला आहे आणि त्याकडे त्या़दृष्टीने कसे बघितले पाहिजे हे अलीकडेच त्यांनी एकदा संगतवार समजावून सांगीतले होते.

प्रत्येक गोष्टीच्या खोलात जाण्याच्या, त्याचा सर्व बाजूंनी विचार करण्याच्या त्यांच्या स्वभावामुळेच गुन्हे आणि गुन्हेगार यांच्या सामाजिक अंगाबाबतही त्यांना कुतुहल असे आणि त्यावर ते विचार करत. त्यांच्या या प्रकारच्या नॉन पोलीसी विचारसरणीमुळेच एकीकडे ते दहशतवादाचा मुकाबला करत असतानाच दुसरीकडे दहशतवाद्यांच्या मानसिकतेचा अभ्यास करत होते. त्यातून या मूळ प्रश्नावरच काही उपाय शोधता येईल का असा त्यांचा विचार असावा. रोगावर औषध देता देताच मूळ रोगाचा अभ्यास करून तो होऊच नये म्हणून काही करता येईल का असा त्यांचा नेहमीच एक विचार असे. या विचारातूनच अंमली पदार्थ विरोधी पथकाचे प्रमुख झाल्यावर अंमली पदार्थ विकणा-यांविरूध्द मोहीम चालवतानाच तरूण मुलांनी या व्यसनांकडे वळू नये म्हणून महापालिका शाळांमध्ये आयपीएच आणि स्त्री मुक्ती संघटनेच्या मदतीने त्यांनी जिज्ञासा प्रकल्प राबवला. (त्याविषयी डॉ. आनंद नाडकर्णींनी विस्ताराने लिहीले आहे.)

करक-यांचे वेगळेपण नेमके इथेच होते. अश्या वेगळ्या पध्दतीने विचार करणारे अधिकारी अपवादात्मक असतात. ते आपल्या विचाराने, कामाने, मेहनतीने समाजाच्या एका छोट्या भागात का होईना पण काही निश्चित बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करतात. त्याकरता वेळ देतात, वेगळा काही विचार करतात. त्यामुळेच त्यांच्या जाण्याने, पटकन स्पष्टपणे लक्षात आले नाही तरी एक समाज म्हणून आपले काहीतरी नुकसान झालेले असते. करक-यांच्या जाण्याने नेमके हेच झाले आहे असे त्यांना जवळून ओळखणा-या सर्वांचीच भावना असेल.

‘व्हॉईस ऑफ होप’

चौदा वर्षांचा वनवास फक्त भारतवर्षात आणि रामायणाच्या काळातच रामाला घडतो असे नाही. अगदी आपल्या शेजारी, आजच्या आधुनिक युगातही गेल्या २० वर्षांपैकी १४ वर्षे स्थानबध्दतेत, विजनवासात, एकांतवासात काढावी लागतात. हा वनवास घडविणारे असतात लष्करी अधिकारी आणि वनवास भोगणारा राम नसतो तर तो भोगणारी असते कमालीची लोकप्रिय, देश पेटविण्याची क्षमता असलेली, लोकशाहीचा आग्रह धरणारी, राजकीय नेतृत्व करणारी एक स्त्री –ब्रम्हदेशमधील (म्यानामार/बर्मा) ऑंग सॅन सू ची. फरक फक्त इतकाच की तिचा हा वनवास केवळ १४ वर्षांचाच असेल अशी खात्री नाही. तो अजूनतरी संपलेला नाही आणि किती काळ चालू राहील ते कोणालाच माहीत नाही.

१९८९ साली सर्वप्रथम म्यानमारमधील लष्करी राजवटीने दॉ सूची (दॉ म्हणजे ऑंटी, काकू – याच नावाने ती म्यानमारमध्ये परीचित आहे) रवानगी स्थानबध्दतेत केली. तिच्याच घरात तिला कैद करण्यात आले. तेव्हापासून सातत्याने ती मधेच आत तर मधेच स्वतंत्र अश्या अवस्थेत आहे, पण त्यातही आतच जास्त. गेल्या २० वर्षांपैकी १४ वर्षे ती तिच्या घरात अटकेत आहे. तिचा गुन्हा एकच आहे. आपल्या देशाची लष्करशाहीच्या विळख्यातून सुटका व्हावी, देशात लोकशाही नांदावी असे तिला मनापासून वाटते आणि से मानणा-या प्रचंड लोकांचा तिला पाठींबा आहे. लष्करशाहीतील तिच्या विरोधकांचा नेमका त्यालाच विरोध आहे आणि म्हणूनच असा लोकशाहीचा विचार मांडणारी व त्याकरता लोकप्रिय असलेली दॉ सू त्यांना खूप धोकादायक वाटते.

पण इतकी वर्षे स्थानबध्दतेत घालवूनही आणि किती घालवावी लागतील याची अनिश्चितता असतानाही तिच्या विचारात काहीच बदल झाला नाही. तिचा लोकशाहीचा आग्रह कायम आहे. त्याला तिचाही नाईलाज आहे कारण स्वांतंत्र्याचे बाळकडूच घेत ती मोठी झाली आहे. तिचे वडील हे खरतर स्वतः एक लष्करी अधिकारी. ब्रम्हदेशचे आधुनिक लष्कर त्यांनी उभे केले. पण त्यांची स्वातंत्र्याची ऊर्मीही तितकीच प्रखर होती. त्यामुळे ब्रिटाशांकडून स्वातंत्र्य मिळवण्यात त्यांचा पुढाकार होता. ते अतिशय लोकप्रिय आणि नव्या स्वतंत्र ब्रम्हदेशचे एक प्रमुख नेते होते. दुर्दैवाने ब्रिटाशांबरोबर स्वातंत्र्याचा करार करून ते परतले आणि पहिल्या निवडणूकांआधीच, नव्याने स्वांतंत्र्य मिळवलेल्या देशाची लोकशाही पध्दतीने नीट घडी बसवण्याच्या आतच १९४८ साली अंतरीम सरकारची बैठक सुरू असतानाच त्या बैठकीतच त्यांची इतर आठ जणांची हत्त्या करण्यात आली. त्या नऊ जणांपैकी सात जण हे ब्रम्हदेशचे महत्वाचे नेते होते. दॉ सू तेव्हा फक्त दोन वर्षांची होती. त्यानंतर सत्तेत आलेल्या सरकारने ऑँगच्या आईची नेमणूक भारतात राजदूत म्हणून केली. त्यामुळे दॉ सूचे महाविद्यालयीन शिक्षण दिल्लीच्या लेडी श्रीराम महाविद्यालयात झाले. तिचे पुढचे शिक्षण ऑक्सफर्डला झाले. (याच विद्यापीठात पुढे ११९९०मध्ये तिची ऑनररी फेलो म्हणून निवड झाली.) तेथेच तिची भेट मायकेल एरीस या ब्रिटनस्थित तिबेटी स्कॉलरबरोबर झाली. त्यांचे प्रेम जमले आणि १९७२मध्ये तिने त्याच्याशी लग्नही केले. त्यांना दोन मुलेही झाली.

पुढे मायकेलला कॅन्सर झाला. त्याने स्थानबध्द असलेल्या आपल्या पत्नीला भेटण्याकरता बर्मी सरकारकडे वारंवार विनंती केली. पण त्याची विनंती मानली गेली नाही. त्याऐवजी दॉ सूने त्याच्याकडे लंडनला जावे असा सरकारचा आग्रह होता. परंतु आपण एकदा देशाबाहेर गेलो की आपल्याला परत येऊ दिले जाणार नाही ही खात्री असल्याने दॉ सू अश्या परीस्थितीतही देश सोडून गेली नाही. त्या दोघांची भेट १९९५च्या ख्रिसमसमध्ये झाली होती. त्यानंतर साडेतीन वर्षांनी मार्च १९९९मध्ये त्याचेदॉ सूशी भेट न होता निधन झाले.

१९८८मध्ये म्यानम्यारला परतण्याआधी दॉ सूने संयुक्त राष्ट्रसंघ, क्योटो विद्यापीठाचे सेंटर फॉर साऊथइस्ट एशिया स्टडीज, भूतान सरकारचे विदेश मंत्रालय या ठिकाणी काम केले. भारतातही सिमला येथील इंडीयन इन्स्टीट्यूट ऑफ अडव्हान्स्ड स्टडीज् येथेही ती फेलो होती. आपल्या आजारी आईकडे बघण्यासाठी ती १९८८साली ब-याच वर्षांनंतर आपल्या देशात परतली. त्याचवेळी म्यानमारमध्ये सुरू झालेल्या विद्यार्थ्यांच्या लोकशाहीवादी चळवळीने ती या संघर्षात खेचली गेली. चळवळ करणा-या विद्यार्थ्यांवर जेव्हा लष्करी राजवटीने अन्वनित अत्त्याचार केले आणि शेकडो जखमी विद्यार्थ्यांना जेव्हा रूग्णालयात आणले गेले त्याचवेळी दॉ सू त्याच रूग्णालयात आपल्या आईची सेवा करत होती. रूग्णालयातील भयानक दृश्य पाहून ती विद्यार्थ्यांच्या मदतीला धावून गेली ती I could not, as my father's daughter, remain indifferent to all that was going on”या भावनेने.आणि तेव्हापासून ती या चळवळीचा एक महत्वाचा भाग बनली. सुरवातीला विद्यार्थ्यांच्या चळवळीचा परीणाम होऊन जनरल ने विनने बर्मा सोशॅलिस्ट प्रोग्रॅम पार्टीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे एकूणच लोकशाहीवादी चळवळीला जोर चढून ती आणखीनच फोफावली. ८-८-८८ अपरायजिंग या नावाने प्रसिध्द असलेली बीएसपीपी सरकारच्या निषेधातील ही चळवळ ८ ऑगस्ट १९८८ साली सुरू झाली आणि देशभर पसरली. त्यात हजारे लोक मारले गेले.

देशातील ही परिस्थिती पाहून दॉ सू हळूहळू या चळवळीची एक प्रमुख कार्यकर्ती झाली. चळवळीचे नेतृत्वच तिच्याकडे आहे. रंगूनमधील प्रसिध्द शेडॉंग पॅगोडासमोर तिने २६ ऑगस्ट १९८८ला जाहीर सभा घेतली आणि लोकशाहीवादी सरकार सत्तेत यावे म्हणून लढा पुकारला. जवळजवळ पाच लाख लोक त्या सभेला हजर होते.तेथपासून ते आजपर्यंत बराच काळ सरकारने तिच्याच घरात तिला कैदी करून आणि लोकांशी तिचा संपर्क येणार नाही याची काळजी घेऊनही जनतेने तिलाच आपले नेतृत्व दिले आहे. परीणामी लष्करी हुकुमशाही राजवटीने प्रयत्न करूनही म्यानमारमधील राजकारण तिच्याभोवतीच फिरत राहीले आहे.

या जाहीर सभेनंतर एक महिन्यातच नॅशनल लीग फॉर डेमॉक्रॅसीची स्थापना करण्यात येऊन दॉ सूची त्याच्या जनरल सेक्रेटरीपदी निवड करण्यात आली. त्यानंतर लगेचच तिच्या आईचे निधन झाले आणि हजारो लोकांच्या उपस्थितीत निघालेली तिची अंत्ययात्रा म्हणजे म्यानमारमधील जुलमी, अत्याचारी लष्करी राजवटीचा निषेध करणारी यात्राच ठरली. याचाच अपेक्षितच परीणाम झाला आणि २० जुलै १९८९ला दॉ सूला प्रथमच तिच्याच घरात स्थानबध्दतेत ठेवण्यात आले. ती कैदेत असूनही १९९०च्या निवडणूकीत नॅशनल लीग फॉर डेमॉक्रॅसीने ८२ टक्के जागा जिंकल्या. लष्करशाहीने मात्र या निवडणूकांचे निकाल मानण्यासच नकार दिला. तेव्हापासून म्यानमारमध्ये लष्करी राजवट आणि लोकशाहवादी नागरिक यांच्यात संघर्ष सुरू आहे. मधूनमधून तो उफाळून वर येतो.

अगदी पहिल्या सभेनंतर लगेचच लष्करी राजवटीने दॉ सूचे सामर्थ्य जाणले आणि तिला मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु अगदी शेवटच्या क्षणी एका मेजरने हस्तक्षेप केल्याने तिला मारायला आलेल्या सैनिकांनी तिच्यावर गोळीबार केला नाही व ती वाचली. जीव वाचला तरी आपले स्वांतंत्र्य मात्र तिला गमवावे लागले. एकूणच ब्रम्हदेशातील लोकशाहीवादी चळवळ आणि दॉ सूची मुक्तता हे विषय जागतिक पातळीवर पोचले आहेत. जगभरातील बर्मीज लोक, त्यांचे पाठीराखे आणि एकूणच लोकशाही, मानवाधिकार मानणारे लोक हे सर्वच जण विविध प्रकारे हा विषय जागतिक पातळीवर सतत जागा ठेवत असतात. त्याचाच एक भाग म्हणून दॉ सूच्या ६४ व्या वाढदिवशी ६४ फॉर ऑंग सॅन सू ची असे एक संकेतस्थळ सुरू करण्यात आले. तिच्या स्वतंत्र्याकरता जगभरातील लोकांनी संदेश द्यावेत अशी कल्पना यामागे होती व ती कमालीची यशस्वी झाली. हजारो लोकांनी आपले संदेश पाठवले.तिच्या एका चाहत्याने लिहीले होते यू विल नेव्हर वॉक अलोन.

दॉ सूकडे जगाचे लक्ष वळायला मुख्यतः कारणीभूत ठरला तो तिला १९९१मध्ये मिळालेला शांततेचा नोबेल पुरस्कार. कैदेत असताना पुरस्कार मिळालेली ती एकमेव नोबेल पुरस्कार विजेती आहे. नोबेलप्रमाणेच जागतिक पातळीवरील अनेक पुरस्कार तिला लाभले. १९९०मध्ये साखारोव्ह प्राईज फॉर फ्रीडम ऑफ थॉट पुरस्काराने तिला सन्मानित करण्यात आले. याखेरीज न्यूहार्थ फ्री स्पिरीट ऑफ द इयर अवॉर्ड २००३, भारत सरकारचे जवाहरलाल नेहरू अवॉर्ड फॉर इंटरनॅशनल अंडरस्टॅंडींग, रॅफ्टो अवॉर्ड हे पुरस्कारही तिला मिळाले, परंतु या सर्वाचा ब्रम्हदेशमधील लष्करी राजवटीवर कोणताही परीणाम झालेला नाही. नोबेल पुरस्कारासोबत मिळालेल्या १.३ दशलक्ष पौंडांचा तिने बर्मीज लोकांना मदत करण्याकरता निधी उभारताच सरकारने परदेशात तिने पैसे खर्च केले म्हणून तिची करविषयक चौकशी करायला सुरूवात केली. अनेक जागतिक संघटना, मोठ्या व महनीय व्यक्ति, अगदीसंयुक्त राष्ट्रसंघ या सगळ्यांनी आवाहन व प्रयत्न करूनही लष्करी राजवटीने तिला आत्तापर्यंत मुक्त केले नव्हते व करतील का याची खात्री नव्हती. क्वचित काही काळ मधेमधे तिच्यावरची काही बंधने थोडीशी हलकी केली गेली आणि परत एकदा काहीतरी कारणाने लादली गेली. म्यानमारमधील निवडणूकांकरता तिला कदाचित यावर्षी तिला मुक्त करतील अशी काहींना आशा होती व त्याप्रमाणे निवडणूकांआधी नाही तरी निवडणूका झाल्यावर तिची मुक्तता करण्यात आली आहे.

मागच्या वर्षी तिच्या स्थानबध्दतेची मुदत संपत आलेली असतानाच अचानक जॉन यट्टॉ हा अमेरीकन युवक तिच्या घराजवळील इन्या तलाव पोहून पार करून तिला भेटायला तिच्या घरी आला. तो पकडला गेला. त्यामुळे परत एकदा तिच्या स्थानबध्दतेत वाढ करण्यात आली. तिच्यापोटी असलेल्या आदरापोटी केवळ आपण तिला भेटायला आल्याचे त्याने म्हटले होते. पण हा सर्वच प्रकार संशयास्पद होता. अनेकांना असा संशय होता की तिच्या स्थानबध्दतेत वाढ करण्याकरता लष्करी राजवटीनेच त्या तरूणाला पाठवले असावे. काहीही असले तरी त्याचा परीणाम मात्र दॉ सूची स्थानबध्दता वाढण्यात झाली हे खरे.

दॉ सू पक्की बुध्दीस्ट आहे. पण तिला परीचित असलेल्या विरोधी विचार आणि अनेकता याबद्दलची सहनशीलता, मानवाधिकारांबद्दलचा आदर आणि नैतिक सभ्यतेवर भर या पाश्चिमात्य परंपरा म्यानमारच्या जीवनात आणून तिने स्वातंत्र्यलढ्याचे स्वरूपच बदलले. आपल्या एका कवितेत ती म्हणते

A free bird...

which is just freed

used to be caged

now flying with an olive branch

for the place it loves.

A free bird towards a Free Burma.

Why do I have to fight???

तिच्या कवितेतील पक्षी पिंज-यातून मुक्त झाला आहे, पण तिच्या वाट्याला हे भाग्य अजून आलेले नाही, केव्हा येईल, येईल का नाही माहीत नाही. पण तिचा लढा मात्र अजूनही त्याच जिद्दीने अगदी ६५व्या वर्षीही सुरू आहे. तिच्यात हे बळ कोठून येते याची कल्पना नाही, पण नोबेल पुरस्काराचे एक मानकरी बिशप डेस्मंड टुटु यांनी मात्र तिला नेमके ओळखून, तिचे अचूक वर्णन केले आहे - In physical stature she is petite and elegant, but in moral stature she is a giant. Big men are scared of her. Armed to the teeth and they still run scared.



आधुनिक जगाचा भाष्यकार
















  • एस्क्वायर नियतकालीकाने त्यांचा समावेश २१व्या शतकातील २१ महत्वाच्या व्यक्तींमध्ये केला आहे.
  • कोंडालीसा राईझच्या मते ही इज इंटलिजंट अबाउट एव्हरीथिंग इन द वर्ल्ड.
  • द नेशनने त्यांचे वर्णन ज्युनियर किसिंजर असे केले आहे.
  • समस्त अमेरिकन जन (आणि जगात इतरत्रही अनेक लोक) सध्या जग त्यांच्या न्यूजवीकमधील स्तंभातून समजून घेतात.
  • फॉरेन अफेअर्स या प्रतिष्ठित नियतकालीकाचे ते सर्वात तरूण व्यवस्थापकीय संपादक होते.
  • अमेरिकेतील सीएनएन व एबीसी न्यूजवर ते आंतरराष्ट्रीय घडामोडींवर भाष्य करतात.
  • फॉरेन पॉलीसी आणि प्रॉस्पेक्ट या नियतकालिकांनी त्यांचा समावेश १०० सर्वोत्कृष्ट बुध्दीवाद्यांमध्ये केला आहे.
  • त्यांचा उल्लेख इंटलेक्च्युअल हार्टथ्रॉब म्हणून केला जातो.
  • न्यूयॉर्क टाइम्सने त्यांचे वर्णन (विख्यात हॉलीवूड सेक्स सिंबॉल) कॅरी ग्रॅंटचा भारतीय अवतार म्हणून केले.
  • ते मूळचे भारतीय (मुंबईतील) आहेत.

हे सर्व मुद्दे वाचत खाली आलो की शेवटच्या मुद्दयावर एकदम अडखळायला होते. भारतीयांची आणि त्यातही विशेषत मराठी लोकांची अमेरीकेतील व्यावसायीक भरारी हा आता खरतर काही नाविन्याचा विषय राहीलेला नाही. पण ही भरारी बघायला मिळाली ती मुख्यत: आधी वैद्यकीय आणि नंतर सॉफ्टवेअर किंवा आर्थिक क्षेत्रात. आंतरराष्ट्रीय राजकीय संबधांचा भाष्यकार म्हणून अमेरिकेत जाऊन नाव कमावल्याचे, तेथील पत्रकारीतेच्या क्षेत्रात महत्वाच्या आंतरराष्ट्रीय नियतकालीकाच्या संपादकपदापर्यंत झेप घेतल्याचे उदाहरण अपवादात्मकच. यापूर्वी, खूप वर्षे आधी प्रणय गुप्ते हे मराठी नाव न्यूयॉर्क टाइम्सच्या आणि टाइम नियतकालीकाच्या पत्रकारांमध्ये आणि स्तंभलेखकांमध्ये समाविष्ट होते. पण गुप्ते मूलत पत्रकार होते, वार्ताहर होते. ते वरीष्ठ असले तरी पत्रकारीतेतील (आणि आंतरराष्ट्रीय संबंधांशी संबंधितही) इतक्या महत्वाच्या पदापर्यंत पोचू शकले नव्हते किंवा त्यांच्या नावाचा इतका बोलबाला झाला नव्हता.

फरीद झकारीयांचे वेगळेपण येथे आहे. ते मूलत: वार्ताहर किंवा पत्रकार नाहीत तर बुध्दीवादी अॅकॅडेमिशियन आहेत आणि आता आंतरराष्ट्रीय संबंधांवरचे भाष्यकार म्हणून त्यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात नाव कमवायला सुरूवात केली आहे. आजही त्यांना वाटते की आपण वार्ताहर होऊ शकलो नसतो. आपली पार्श्वभूमी वैचारीक आणि अॅकॅडमिक आहे. विश्लेषक आणि भाष्यकार हीच आपली बलस्थाने आहेत. आपले विश्लेषण मांडण्यापुरताच आपला पत्रकारितेशी संबंध आहे. अर्थात वार्ताहर म्हणून न काम करताही न्यूजवीक इंटरनॅशनलचे संपादक म्हणून मात्र ते आता पूर्ण पत्रकार आहेत.

त्यांच्या या यशाबाबत थोडक्यात असे म्हणता येईल की बंदीस्त वातावरणाच्या काळात अमेरिकेत जाऊन पत्रकारीतेच्या क्षेत्रात जी वाट प्रणय गुप्ते यांनी मोकळी केली त्याच वाटेवरून आजच्या अधिक खुल्या आणि मोकळ्या जागतिक वातावरणात आपला प्रवास सुरू करत फरीद अतिशय लहान वयात त्या वाटेच्या शिखरापर्यंत येऊन पोचले. २००० साली, वयाच्या केवळ ३६ व्या वर्षी ते न्यूजवीक इंटरनॅशनल या प्रतिष्ठित साप्ताहीकाचे आंतरराष्ट्रीय संपादक झाले आणि आपल्या लिखाणाने त्यांनी जगाचे लक्ष आपल्याकडे वेधून घ्यायला सुरूवात केली. मागील वर्षापासून चे सीएनएन या वाहिनीवर फरीद झकारीया जीपीएस (ग्लोबल पब्लीक स्क्वेअर) हा आंतरराष्ट्रीय घडामोडींवरील साप्ताहीक कार्यक्रम सादर करतात. त्याआधी पाच वर्षे त्यांनी पब्लीक सर्विस ब्रॉडकास्टींगवर (पीबीएस) फॉरेन एक्स्चेंज विथ फरीद झकारीया हा कार्यक्रम सादर केला होता. त्यांची चार पुस्तके प्रसिध्द झाली आहेत.

पत्रकारीता, राजकारण, बौध्दिक विश्लेषण व वादविवाद आणि आंतरराष्ट्रीय राजकारण व संबंध - विशेषत मुस्लीम जग आणि त्याचे प्रश्न, या सर्वाचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळाले. बुध्दीमान राजकारणी आणि लेखक वडील डॉ. रफीक झकारीया आणि वरीष्ठ पत्रकार आई फातिमा झकारीया यांचा वारसा त्यांना मिळाला. डॉ. रफीक झकारीया यांची कॉंग्रेसचे जेष्ठ नेते आणि महाराष्ट्रातील मंत्री यापेक्षाही जगाला जास्त चांगली ओळख होती ती मुस्लीमांकरता शैक्षणिक कार्य करणारे कार्यकर्ते म्हणून, इस्लामचे गाढे अभ्यासक म्हणून आणि त्याचबरोबर पंडीत नेहरूंचे चरीत्र लिहीणारे (स्टडी ऑफ नेहरू) व मुस्लीम प्रश्नावर लेखन करणारे व पुस्तके लिहीणारे लेखक, बुध्दीवंत म्हणून. आई फतिमा प्रथम खुशवंत सिंग यांच्या संपादकत्वाखाली निघणा-या टाइम्स वृत्त समूहातील इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडीयाशी संबंधित आणि नंतर टाइम्स ऑफ इंडीयाच्या रविवार पुरवणीच्या संपादक.

या सर्व वातावरणाचा परीणाम त्यांच्यावर झाला. लहानपणापसूनच विविध क्षेत्रातील सर्वोच्च आणि सर्वोत्कृष्ट लोकांना त्यांना बघता आले, त्यांना भेटता आले. कोणतीच गोष्ट त्यावेळी आमच्या आवाक्याबाहेरची नव्हती, सर्व काही शक्य होते, असे त्यावेळच्या परीस्थितीचे वर्णन फरीदनी न्यूयॉर्क टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत केले आहे. त्याचवेळी देशातील जातीय दंगली बघितल्यामुळे धर्माची काय ताकद आहे, चांगली आणि वाईटही, आणि धर्म लोकांना प्रोत्साहीत कसा करू शकतो, अगदी दुस-याला मारायलाही, त्याची पूर्ण कल्पना आल्याचे फरीद सांगतात.

मुंबईतील कुलाब्यासारख्या अत्यंत उच्चभ्रू वातावरणात वाढलेल्या फरीदचे शालेय शिक्षण कॅथिड्रल अँड जॉन कॅनॉन शाळेत झाले. फरीद आणि त्यांचे कुटुंबीय मुस्लीम रीतीरीवाज पाळत असूनही त्यांनी शालेय शिक्षण घेतले ते मात्र ख्रिश्चन शाळेत. रोज त्यांची शाळा सुरू व्हायची ती ख्रिश्चन प्रार्थनांनी. याच ठिकाणी त्यांचा पाश्चिमात्य संस्कृतीशी प्रथम परीचय झाला. केवळ एव्हढेच नाही, तर पाश्चिमात्य जग आणि इस्लामिक जग यांच्यातील फरकाबद्दल सजगताही त्यांच्यात निर्माण झाली. त्या सजगतेचा आज त्यांना लिखाण करताना उपयोग होत असतो.

शाळेतून ते थेट गेले ते अमेरिकेतील येल विद्यापीठात बी.ए. करायला. येल का प्रिन्स्टन असा प्रश्न त्यांच्यापुढे होता. त्यांनी चक्क नाणेफेक केली आणि कौल प्रिन्स्टनला लागला. पण मनात कुठेतरी त्यांना येलला जावेसे वाटत होते. मग त्यांनी ठरवले ऩाणेफेक एकूण तीन वेळा करायची. आणि पुढच्या दोन वेळी कौल चक्क येलला लागला आणि १९८६त ते येलमध्ये दाखल झाले. तेथे ते बर्कले विद्यापीठ आणि स्क्रोल व की सोसायटीचे सदस्य तर येल पोलीटीकल यूनियनचे अध्यक्ष झाले. त्या काळात विद्यापीठाजवळच्या उपहारगृहात पहाटे ४ वाजता सकाळच्या चहाबरोबर त्यांची राजकीय चर्चा सुरू होत असे. उजव्या विचारसरणीच्या पक्षाचा सदस्य म्हणून त्यांनी येल पोलीटीकल यूनियनमध्ये केलेल्या भाषणांचीही येलमध्ये चर्चा असे. काहीश्या ढेपाळलेल्या येल पोलीटीकल यूनियनमध्ये त्यांनी परत एकदा जान आणली.

त्यांच्याकरता पहिली चार वर्षे अमेरिकेची ओळख म्हणजे म्हणजे फक्त येल एव्हढीच होती. येल आणि येलबरोबरच अमेरिकेच्या आणि अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाच्या ते प्रेमातच पडले. येलच्या तर ते इतके प्रेमात होते की पदवीदान समारंभाच्या आदल्या रात्री ते दुखाने घशाशी येणारे आवंढे गिळत रात्रभर विद्यापीठाच्या आवारात हिंडत होते. गंमत म्हणजे त्याच येल विद्यापीठात ते २० वर्षांनंतर परत गेले ते विद्यापीठाने येल कॉर्पोरेशनचे विश्वस्त म्हणून त्यांची नेमणूक केल्यावर. पत्रकार आणि लेखकाच्या घरात ते जन्मले आणि वाढले असले तरी ज्या पत्रकारीतेच्या क्षेत्रात त्यांनी आता नाव कमावले आहे त्याची सुरूवातही त्यांनी येलमध्येच केली य़ेल पोलीटीकल मंथलीच्या माध्यमातून. सर्वात गंमतीचा भाग म्हणजे सध्याच्या मुंबईतील कोणत्याही हुशार मुलाप्रमाणे त्यांनीही येलमध्ये प्रवेश घेतला तो गणित, शास्त्र आणि अभियांत्रीकीकरता. पण लौकरच चूक लक्षात आली आणि ते आंतरराष्ट्रीय संबंधांकडे वळले.

येलनंतर अर्थातच पीएचडीकरता पुढचा टप्पा होता बहुतांशी उच्च शिक्षितांची अमेरिकेतील पंढरी, हार्वड. तेथे त्यांनी सरकारया विषयात डॉक्टरेट मिळवली. हार्वर्डमध्येच टाईम नियतकालीकाचे माजी संपादक आणि सीएनएन चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी वॉल्टर इझॅकस किसिंजरचे चरीत्र लिहीत असताना हार्वर्ड स्क्वेअरमध्ये त्यांनी फरीदना पाहिले आणि त्यांना किसिंजरची आठवण झाली. कमालीचा बौध्दिक आत्मविश्वास आणि संकल्पनांमध्ये संबंध जोडण्याची हुशारी हे दोघांमधील साम्य असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

१९७३ साली शांततेकरता नोबेल पुरस्काराने सन्मानित हेन्री किसिंजर हे रिचर्ड निक्सन अमेरिकेचे राष्ट्राध्क्ष असताना प्रथम त्यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि नंतर परराष्ट्र सचिव होते. १९६९ ते १९७७ या आठ वर्षांत अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणावर त्यांचा प्रभाव होता. एका बाजूने त्यांनी रशियाबरोबरच्या संबंधातील तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला तर दुसरीकडे पाकिस्तानच्या मदतीने चीनशी संबंध सुरळीत केले. फरीद यांची तुलना किसिंजर यांच्याबरोबर फक्त इझॅकस यांनीच केली असे नाही तर अनेकांना फरीदही किसिंजर यांच्याप्रमाणे परराष्ट्र सचिव होतील असे वाटते आणि नेशन नियतकालिकाने तर त्यांना ज्युनियर किसिंजर म्हणूनच संबोधायला सुरूवात केली. इझॅकस यांनी लिहीलेल्या किसिंजर यांच्या चरीत्रातील काही प्रकरणांवर त्यानी टीका केली होती आणि त्याकरता स्वत किसिंजर यांनी फरीदना चर्चेकरता बोलावले होते तरी किसिंजर यांच्याबरोबर आपली केली जाणारी तुलना त्यांना नक्कीच आवडली असणार.

हार्वर्ड विद्यापीठातच फरीदनी नंतर अमेरिकेचे परराष्ट्र धोरण या विषयावर एक संशोधन प्रकल्प हाती घेतला. त्याचबरोबर हार्वर्डसहीत कोलंबिया आणि केस वेस्टर्न या विद्यापीठात त्यांनी आंतरराष्ट्रीय संबंध आणि राजकीय तत्वज्ञान हे दोन विषय शिकवले. याच काळात त्यांनी वॉल स्ट्रीट जर्नल आणि न्यूर्यॉक टाइम्स सारख्या प्रतिष्ठित वर्तमानपत्रात तर न्यूयॉर्कर आणि न्यू रिपब्लीक सारख्या नामवंत नियतकालीकांमध्ये लिखाण केले. हे सर्व लिखाण परराष्ट्र धोरणासारख्या गंभीर विषयावर होते.

पण गंमत म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंधांबाबत अत्यंत गंभीर लिखाण करणारे फरीद त्याच काळात स्लेट या इंटरनेटवरील नियतकालीकाचे वाईन या विषयावरीलही स्तंभलेखक होते. त्या काळात त्यांनी अमेरिकेतील वाईन प्रेमी जर्मन वाईन चांगली असूनही त्याला उगाचच कशी नाके मुरडतात यावर लेख लिहीला होता. त्यांच्या मूळ आवडीप्रमाणे त्यातही त्यांनी आंतरराष्ट्रीय संबंध, हिटलर, मार्क्स वगैरे मंडळी आणली होती. वाईन आणि चविष्ट व रूचकर पदार्थ खाणे ही त्यांची आवड आजही कायम राहीली आहे. न्यूयॉर्कमधील आपल्या घरी ते वारंवार पत्रकार मित्रांना बोलवून उत्कृष्ट वाईन आणि रूचकर खाद्यपदार्थांनी त्यांचा पाहुणचार करत असतात. एका बाजूला आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील बौध्दीक कसरतींमध्ये तज्ज्ञ म्हणून नाव कमावणे आणि दुसरीकडे खाद्यपदार्थही बनवणे व रस घेऊन खाणे हे ऐकायला जरा विचित्र वाटते. पण फरीद यांचे या विषयावरचे मत ऐकले की हे असे कसे ते कळते. त्यांच्या मते केवळ एकाच विषयात तज्ज्ञ असणे हे कीटकांचे वैशिष्ट्य झाले. माणसाला एकाच वेळी रशियातील सद्य परीस्थितीवर गंभीर चर्चा करता आली पाहिजे आणि त्याचवेळी रूचकर चिकन स्ट्यूही करता आले पाहिजे. याच तत्वाने ते आज आपल्या तीन मुलांचे पालकत्व संभाळताना आणि संसारातील जबाबदा-या स्वीकारताना अतिशय आनंद घेतात. काही वेळा हे सर्व करताना शरीराने थकायला होते. पण ते तेव्हढ्यापुरतेच, त्यातला आनंद वेगळाच असतो असे त्यांना वाटते.

विविध दैनिकांत व नियतकलीकांमध्ये त्यांचे लिखाण सुरू असतानाच त्यांना अचानक मोठी संधी मिळाली. आयझॅकसननेच त्यांचे नाव फॉरेन अफेअर्स या प्रतिष्ठित नियतकालिकाकरता सुचवले. ते फॉरेन अफेअर्स मध्ये आले आणि स्वतबाबतचे विक्रम नोंदवायला त्यांनी सुरूवात केली. तेव्हा केवळ २८ वर्षाचे असलेले फरीद फॉरेन अफेअर्स नियतकालीकाचे आत्तापर्यंतचे सर्वात तरूण व्यवस्थापकीय संपादक झाले. त्यावेळची त्यांची एक गंमत सांगीतली जाते. इतके मोठे पद इतक्या लहान मिळाल्याने आपल्या व्य़क्तीमत्वाला वजन यावे आणि आपण त्या पदाला शोभून दिसावे म्हणून फरीदनी कॉन्टॅक्ट लेन्सेस लावणे सो़डून देऊन चश्मा लावायला सुरूवात केली होती.

फॉरेन अफेअर्स हे परराष्ट्र नीती या विषयावरील एक अत्यंत महत्वाचे आणि प्रतिष्ठीत अॅकॅडमिक नियतकालीक मानले जाते. या विषयात गती असणा-या अतिशय निवडक लोकांमध्ये ते वाचले जाते. परराष्ट्र संबंध आणि नीती यात येनकेनप्रकारे गुंतलेले जगभर पसरलेले परराष्ट्र मंत्री, सचिव, अभ्यासक, धोरणकर्ते या सर्वांच्या आयुष्याचा फॉरेन अफेअर्स वाचणे हा एक महत्वाचा भाग आहे. यापैकी अनेकांचे निर्णय आणि धोरणे फॉरेन अफेअर्स काय म्हणते यावर अवलंबून असते किंवा ठरते. त्यामुळे त्यातील प्रत्येक लेख, प्रत्येक मुद्दा, प्रत्येक विचार, प्रत्येक शब्द महत्वाचा असतो.

अश्या नियतकालीकात काम करायला मिळणे, तेही थेट व्यवस्थापकीय संपादक म्हणून, अशी संधी फार महत्वाची असते कारण अश्यावेळी तुम्ही महत्वाच्या लोकांच्या नजरेत येता. तुमच्या लिखाणावर चर्चा सुरू होते. अतिशय उच्च पातळीवरून त्याची दखल घ्यायला सुरूवात होते. फरीदच्या आयुष्यातील हा एक महत्वाचा टप्पा होता. तेथून त्यांच्या नावाचा बोलबाला व्हायला सुरूवात झाली. परंतु तरीही त्यांना ओळखणारे वर्तुळ तसे लहानच होते, पण महत्वाच्या लोकांचे होते, धोरण ठरवणा-यांचे, निर्णय घेणा-यांचे होते. फॉरेन अफेअर्सचे संपादक म्हणून काम करताना आपण आपल्या मूळ शैक्षणिक क्षेत्राशी प्रामाणिक आहोत असे त्यांना वाटत होते.

फरीद फॉरेन अफेअर्स चे संपादक झाले त्याच्या आधी जगात दोन महत्वाच्या घटना घडल्या. एक म्हणजे ९१ साली सोविएट यूनियनचा अस्त झाला. आणि त्याच सुमारास दुसरीकडे यूरोपियन यूनियनच्या उभारणीला सुरूवात झाली. एका बाजूला समाजवादाच्या विघटनाची आणि लयाला जाण्याची प्रक्रिया तर दुसरीकडे भांडवलशाहीच्या एकीकरणाची प्रक्रिया. आपले शिक्षण संपवून आपापल्या करीयरमध्ये सुरूवातीच्या काळात स्थिरस्थावर होऊ लागलेल्या फरीदच्या पिढीने या काळात जे जग पहायला सुरूवात केली ते समाजवादी विचारसरणीची पिछेहाट झालेले आणि अमेरिकेची दादागिरी असलेले यूनिपोलार जग होते. यूनिपोलार जगाचा उदय, तंत्रज्ञानाचा उदय आणि कॉर्पोरेट भांडवलशाहीचा उदय या तीन गोष्टींनी मुख्यत या पिढीची मानसिकता व विचारसरणी घडवली.

त्यामुळेच या पिढीला वाटत आले आहे की जगाचा प्रश्न एकच आहे आणि तो म्हणजे उत्तम व्यवस्थापन नसण्याचा. या पिढीची धारणा आहे की तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन जगाचे सर्व प्रश्न सोडवू शकतात. आपल्या वडीलांबद्दल बोलताना फरीद यांनी सर्व लहानसहान प्रश्न सरकार सोडवू शकेल असा त्यांना विश्वास होता असा उल्लेख प्लेब़ॉयमधील आपल्या मुलाखतीत केला आहे. वडीलांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याचाही त्यांनी अभिमानाने उल्लेख केला आहे. मात्र त्यांचे स्वतचे विचार मात्र त्यांच्या समकालीनांप्रमाणे प्रश्न सोडवण्याकरता केवळ तंत्रज्ञान व व्यवस्थापन कौशल्याची गरज असल्याच्याच बाजूचेच आहेत. तंत्रज्ञान, व्यवस्थापन कौशल्य आणि जागतिक दृष्टीकोन, जे लोक या तीन गोष्टीत यशस्वी झाले ते कॉर्पोरेट भांडवलशाहीत यशस्वी झाले. फरीद या पिढीचे एक महत्वाचे प्रातिनिधीक उदाहरण आहे.

याच विचारसरणीने त्यांना अमेरिकेतील कडवे उजव्या विचारसरणीचे प्रतिगामी रिपब्लीकन रिगनाईट बनवले. आपण रिगन यांचे चाहते का झालो हे सांगताना, फरीद त्याचे कारण भारतातील आपल्या लहानपणीच्या दिवसांना देतात. त्यांच्या मते लहानपणी भारतात ते ज्या अत्यंत नियंत्रीत अर्थव्यवस्थेत वाढले त्या अर्थव्यवस्थेचा त्यांनी बघितलेला सर्वात मोठा दोष म्हणजे नोकरशाहीच्या हातात खूप सत्ता आल्याने भ्रष्टाचारात होणारी प्रचंड वाढ. भारतातील अवस्था बघून केंद्रीय नियोजन यशस्वी ठरू शकत नाही असे त्यांचे मत झाले. भारताचे तेव्हाचे सोविएट रशियाधार्जिणे धोरणही त्यांना चुकीचे वाटते. त्यांच्या मते ते केवळ सरकारचे धोरण होते सामान्य लोक मात्र अमेरिकेच्या बाजूने होते. भारतीयांना आधुनिकता हवी होती आणि त्यांचे स्वप्न अमेरिकेशी निगडीत होते. सरकारच्या सोविएटधार्जिण्या धोरणाचा उल्लेख ते गव्हर्मेंट इंजिनीयर्ड अँटी अमेरिकॅनिझम असा करतात. त्यांच्या या मतांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे माजी ऱाष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रिगन यांनी केलेला मुक्त जगाच्या संकल्पनेचा पाठपुरावा आणि त्यांचा कम्युनिस्टविरोध यांनी ते खूपच प्रभावित झाले आणि तेव्हापासून ते रिगन यांच्या संपूर्ण मुक्त अर्थव्यवस्थेच्या पालखीचे भोई झाले.

मात्र पुढे क्लिंटन यानी त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात मुक्त व्यापार आणि दुर्बलांचा विकास यांचा साधलेला समतोल त्यांना अधिक भावला. रिपब्लीकनांनी क्लिंटन यांना विरोध केल्याने त्यांनी रिपब्लीकनांवर टीका केली. परीणामी रिपब्लीकनांच्याही प्रखर टीकेचे ते धनी झाले.

आता ते स्वतला सेंटरीस्ट किंवा मध्यममार्गी मानत असले तरी त्यांची प्रतिमा मात्र काहीशे उजव्या विचारसरणीचे, मुक्त बाजारपेठेच्या बाजूचे अशीच राहीली. त्यांच्या उजव्या विचारसरणीमुळे दुस-या बाजूलाही त्यांनी त्यांचे खूप टीकाकार निर्माण केले आहेत आणि तेही त्यांच्यावर कडवी टीका करत असतात. पण याच विचारसरणीने त्यांचा अमेरिकन पत्रकारीतेतील पुढचा मार्ग मोकळा केला हेही खरे. अमेरिकेन व्यवस्थेला आवडेल असेच त्यांचे लिखाण ब-याचदा असल्याने त्यांना इतरही ठिकाणाहून लिखाणाची आमंत्रणे येणे स्वाभाविकच होते आणि तसे ते आलेही. न्यूजवीक या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या न्यूजमॅगझीनने त्यांचा आंतरराष्ट्रीय संबंधांवरचा मासिक स्तंभ सुरू केला.

न्यूजवीककडून बोलावणे आल्यावर त्यांची पहिली प्रतिक्रिया होती, व्हॉट द हेल?’ पण फरीद यांच्याकरता हा वेगळाच अनुभव होता. अॅकॅडमिक नियतकालिकात लिखाण करण्यापासून ते आता खूप अधिक वाचकसंख्या असलेल्या एका लोकप्रिय साप्ताहीकाचे स्तंभलेखक झाले होते. सर्वसामान्य वाचकांकरता लिहीण्यासाठी वेगळ्याच कौशल्याची गरज असते. बुध्दीवाद्यांकरता लिहीण्यापासून ते सर्वसामान्य वाचकांकरता लिहीण्याचा हा अनुभव त्यांना नंतर आवडू लागला. त्यांच्या मते तुम्ही जर राजकारण आणि पब्लीक पॉलीसी या विषयावर लिहीणार असाल आणि त्यावर तुम्हाला जर चर्चा घडवून आणायच्या असतील तर तुम्हाला मोठ्या समुदायाकरता लिहीता आलेच पाहिजे.

फरीदचा न्यूजवीकमधील मासिक स्तंभ नंतर साप्ताहीक करण्यात आला. १९९९मध्ये अखेर त्यांना न्यूजवीक इंटरनॅशनल चे संपादकपद स्वीकारण्याची विनंती करण्यात आली. त्यांनी हे पद स्वीकारावे अशी शिफारस खुद्द हेन्री किसिंजर यांनी त्यांना केली. पारंपारीक मतांपेक्षा वेगळे मत मांडण्याचे धाडस त्यांच्याकडे आहे असे त्यांच्याबद्दल किसिंजर यांचे मत आहे.

फरीद यांच्याकरता ही मोठी संधी होती. २६ भाषांमध्ये निघणा-या आवृत्त्या, यूरोप, आशिया आणि लॅटीन अमेरिकेकरता काढल्या जाणा-या इंग्रजी भाषेतील तीन परदेशी आवृत्त्या यांची संपादकीय जबाबदारी त्यांच्यावर आहे आणि या आवृत्त्यांद्वारा ते जगभर पसरलेल्या २.४ कोटी वाचकांपर्यंत दर आठवड्याला पोचतात. या वाचकात विविध प्रकारचे लोक सामील आहेत, सामान्यांपासून ते डिसिजन मेकर्स आणि जागतिक दर्जाचे स्टेटसमन अथवा आपापल्या देशाच्या राजकारणात महत्वाची भूमिका बजावणा-या राजकारण्यापर्यंत. या संधीमुळे जगाचे सर्व दरवाजे जणू त्यांना खुले झाले. ब्लेअरपासून मुशर्रफपर्यंत जगातील कोणत्याही राजकारण्याला सहजगत्या भेटणे त्यांना शक्य झाले. कोणतीच गोष्ट त्यावेळी आमच्या आवाक्याबाहेरची नव्हती, सर्व काही शक्य होते असे जे वर्णन त्यांनी आपल्या लहानपणाबद्दल केले आहे, त्याचाच अनुभव ते परत एकदा आता जागतिक पातळीवर घेत आहेत.

संपादकपदी विराजमान झाल्यानंतरही फरीद यांचा खरा बोलबाला झाला आणि ते ख-या अर्थाने भाष्यकार म्हणून प्रकाशात आले ते ९/११ च्या हल्ल्यानंतर तीनच आठवड्यांनी त्यांनी लिहीलेल्या पॉलीटीक्स ऑफ रेज - व्हाय डू दे हेट अस या दीर्घ कव्हर स्टोरीमुळे. या लेखात त्यांनी मुस्लीम दहशतवादाची मुळे कशात आहेत आणि त्यावर उपाय काय ते मांडण्यांचा प्रयत्न केला होता.

त्यांच्या मते अरब जगतात आलेले साचलेपण आणि त्यातील चुका यामुळे मुस्लीम दहशतवादाला खतपाणी मिळाले आहे. त्यामुळे दहशतवाद पूर्णपणे संपवायचा असेल तर अमेरिकेला केवळ दहशतवाद कसा संपवता येईल त्याची योजना तैय्यार करून चालणार नाही तर संपूर्ण अरब जगतात सुधारणा घडवून आणण्याचीही योजना बनवावी लागेल असे प्रतिपादन त्यांनी या लेखात केले होते.

पिढ्यानपिढ्यांच्या प्रयत्नाने अरब जगतात खुले वातावरण निर्माण करून इस्लामला आधुनिक जगात आणण्यास मदत करण्याच्या कल्पनेवर त्यांनी जोर दिला होता. हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण अमेरिकेत अरब जगताविषयी प्रचंड संताप असताना, अरब जगताला समजून घेण्याविषयीचे विधान करणे धाडसाचे होते. पण त्यांनी ते केले आणि अमेरिकेचे व जगाचे लक्ष स्वत:कडे वेधून घेतले. या आणि त्या पुढच्या काही लेखांमुळे फरीद सांस्कृतिक दुभाषे आणि अरब जगताशी असणारा पूल मानले जाऊ लागले. इस्लाम आपल्याला पुस्तकांपलीकडे जाऊन इंस्टींकटीव्हली कळल्याचा दावा ते करतात.

अमेरिकेप्रमाणेच हा लेख मुस्लीम जगतातही गाजला आणि टीकेचे लक्ष्य ठरला कारण मुस्लीमांचेही कुठे चुकत आहे आणि राजकारणाकरता धर्माचा वापर करण्याची चूक ते कशी करत आहेत ते ही या लेखात मांडण्यात आले होते. मुस्लीम जगतावरची त्यांची ही प्रतिक्रिया अनेकांना खूपच झोंबली. लंडनमधीत एका मशिदीतून त्यांना मारण्याचा फतवाही काढण्यात आला होता. य़ा फतव्याने ते काही काळ थोडेसे घाबरले पण त्याचबरोबर आपल्याबाबत फतवा निघावा याचा अर्थ आपण आता लक्ष वेधून घेण्याइतके मोठे झालो या विचारांनी त्यांना स्वत:बाबत सार्थ अभिमानही वाटला. पण तो क्षणिक ठरला. त्यांच्या सीआयए तील मित्राने फार समाधानात राहू नकोस असे फतवे ते रोज काढत असतात असे सांगत त्यांचे विमान जमिनीवर आणले. एफबीआय ने मात्र त्यांच्या कामकाजाच्या पध्दतीनुसार ही धमकी गांभीर्याने घेतली आणि काही काळ त्यांच्या पत्रव्यवहारावर लक्ष ठेवले.

एकूणातच वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्यानंतर फरीद हे नाव जगात मोठया प्रमाणात घेतले जाऊ लागले आणि अमेरिकेतील त्यांचा खरा उदय हा या हल्ल्यानंतर वेगाने झाला. त्यात त्यांचे विश्लेषणात्मक कौशल्य, लेखनकौशल्य आणि हुशारी याबरोबरच तिस-या जगातल्या देशातील मुस्लीम असण्याच्या पार्श्वभूमीचाही उपयोग झाला. त्यानंतर त्यांनी सातत्याने इराक युध्द, इराण, अमेरिकेची जगातील ढवळाढवळ या विषयावर लिखाण केले. एकूणातच अमेरिकेची होत असलेली पीछेहाट, अमेरिकेचा (सरकारचा आणि लोकांचाही) स्वार्थीपणा आणि अमेरिकेनंतरचे जग हा त्यांच्या लिखाणाचा परीघ आहे. अमेरिकेच्या स्वार्थीपणाचे उदाहरण म्हणून ते लंडनमधील बॉंबिंगचे उदाहरण देतात. तेथील ट्यूब रेल्वेत बॉबिंग झाल्यानंतर केवळ दहा मिनिटे ती बातमी दिल्यावर लगेचच अमेरिकन माध्यमे अमेरिकेकडे वळली आणि आपल्या शहरातील भुयारी रेल्वे कितपत सुरक्षित आहे याची चर्चा करायला त्यांनी सुरूवात केली. सामान्य अमेरिकन लोकांना जग समजावून घेण्याची गरज आहे आणि त्यामुळेच टीव्हीवरील आपल्या कार्यक्रमात फरीद ९५ टक्के अमेरिकेबाहेरचे विषय हाताळतात. कार्यक्रमात तज्ज्ञ म्हणून भाग घ्यायलाही ते ब-याचदा इतर देशातील लोकांना बोलावतात.

छपाई माध्यमाइतकाच सुंदर जम फरीद यांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमातही बसवला आहे. टीव्हीवरील त्यांचे साप्ताहीक कार्यक्रमही लोकप्रिय आहेत. इतके प्रचंड वेगाने आणि संख्येने लिखाण आणि तितक्याच वेगाने टीव्हीवरील कार्यक्रम, तेही आंतरराष्ट्रीय संबंधांसारख्या सतत बदलत्या परीस्थितीबाबत आणि ज्यामुळे संबंध बिघडतील, प्रसंगी युध्दही भडकू शकेल अश्या अत्यंत नाजूक विषयावर आणि त्याकरता सतत प्रचंड वाचन, विचार, लोकांना भेटणे. अमेरिकेचा कामाचा प्रचंड वेग आणि विषयाच्या खोलात जाण्याची वृत्ती फरीद यांनी नेमकी पकडली आहे. त्यांच्या यशात या गुणांचा मोठा वाटा आहे. त्यांनी केवळ अमेरिकेचे नागरीकत्व स्वीकारलेले नाही. ते पूर्णार्थाने, सर्व अंगांनी अमेरिकन झालेले आहेत. आपल्या मुलाखतींमध्ये अमेरिकेबद्दल आणि अमेरिकन लोकांबद्दल बोलताना ते वुई असा उल्लेख करतात. त्यांनी अमेरिकन नागरीकत्व स्वीकारले असले तरी वर्षातून एकदा ते भारतात चक्कर मारतातच.

ते केवळ भारतात एक चक्कर मारतात असे नाही तर भारत नेमका कुठे चालला आहे हे ही ते बघत असतात, त्यावर लिहीतही असतात. भारताने त्यांच्या लहानपणापेक्षा आता आपली आर्थिक धोरणे खूपच बदलेली असल्याने आणि ती त्यांच्या विचारांशी सुसंगत असल्याने भारत हा त्यांच्या आकर्षणाचा, कौतूकाचा विषय झाला आहे.

स्विट्झर्लंडमधील डॅवोस येथे दरवर्षी होणा-या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमविषयी २००६ साली लिहीताना त्यांनी म्हटले होते की त्यावर्षी परीषदेवर पूर्णपणे भारताचा पगडा होता. आधीच्या संपूर्ण दशकात दुस-या कोणत्याही देशाला इतके आपल्याकडे लक्ष वेधून घेणे जमलो नव्हते. दुसरे उदाहरण त्यांनी दिले आहे ते त्सुनामीचे. त्सुमानीनंतर केवळ दोन आठवड्यात पंतप्रधान मदत निधीत ८ कोटी डॉलर्स जमा झाले. २००१ च्या गुजरात भूकंपानंतर तितकीच रक्कम जमा व्हायला जवळ जवळ वर्ष लागले होते. वादग्रस्त अणूकराराच्या संदर्भात त्यांनी या काराराला पाठिंबा देताना त्यामुळे भारत कसा जगातील महासत्तांच्या पंक्तीत जाऊन बसेल याचेही प्रतिपादन केले आहे.

भारत, इतर देश, एकूणातच आंतरराष्ट्रीय संबंध, या सर्वांइतकेच महत्त्व ते परस्पर मानवी संबधांना देतात असे त्यांच्या येलमधील मित्रांचे म्हणणे आहे. बावीस वर्षांपूर्वी येलमध्ये निर्माण झालेल्या मैत्रीच्या धाग्यांना ते आता इतके मोठे झाले तरी तितकेच महत्त्व देतात, तितकेच जपतात, त्या संबंधांची तितकीच काळजी घेतात. बावीस वर्षांपूर्वी अमेरिकेबरोबर निर्माण झालेल्या संबंधानांही त्यांनी तितकेच जपले आहे आणि त्याचीही तितकीच ते काळजी घेतात. हे संबंध त्यांनी इतके जपले आहेत की अमेरिकन लोकांनाही त्यांचा विश्वास वाटतो. जग हे अधिकाधिक धोकादायक होत चालले आहे आणि अश्यावेळी फरीद (हे एक मूळचे भारतीयच) आपल्याला त्या धोक्यातून बाहेर काढतील अशी त्यांची धारणा आहे. हा विश्वास त्यांनी ९/११ नंतरच्या अमेरिकेला केवळ आपल्या लिखाणाने दिला आहे.

सध्या त्यांचे बरेचसे लिखाण आणि चिंतन अमेरिकेच्या भवितव्याविषयी असते. अमेरिका अनेक बाबतीत जगात पहिल्या क्रमांकावर होती. अमेरिकेचा हा पहिला नंबर घसरत चालल्याचे त्यांचे प्रतिपादन आहे. हे सांगताना ते सामान्य माणसाला आकर्षित करतील, पटतील अशी उदाहरणे निवडतात. जगातला सर्वीधिक खपाचे वर्तमानपत्र आता य़ूएसए टूडे नाही तर टाइम्स ऑफ इंडिया आहे, जगातील सर्वात उंच इमारत आता अमेरिकेत नाही तर तैवानमध्ये आहे अणि दुबई त्याहून ऊंच इमारत बांधत आहे, सर्वात मोठी रिफायनरी अमेरिकेत नाही तर भारतात आहे, सर्वात मोठी फॅक्टरी आणि मॉल अमेरिकेत नाही तर चीनमध्ये आहे. जगातील सगळ्यात मोठे असे १० मॉल्स सर्व अमेरिकेबाहेर आहेत. बॉलीवूड सर्वार्थाने हॉलीवूडपेक्षा मोठे आहे. अश्या जवळजवळ १० गोष्टींची यादीच फरीदनी काढली आहे की ज्यात अमेरिका प्रथम क्रमांकावर होती आणि आता नाही. वरवर पाहता या सर्व गोष्टी अनेकांना खूप छोट्या आणि मुख्य म्हणजे संदर्भहीन वाटतील. पण फरीद यांच्यो मते सहजपणे दुर्लक्ष करता येण्यासारख्या या घटना नाहीत. हा एक नव्याने घडणारा बदल आहे. गेल्या फक्त तीन वर्षात हा बदल घडतोय, तो वेगाने घडतोय आणि ही तर फक्त सुरूवात आहे. अनेक बाबतीत इतर देश अमेरिकेच्या पुढे जाण्याचा जो जागतिक प्रवाह सुरू झाला आहे त्याची ही फक्त झलक आहे.

फरीद केवळ एव्हढ्यावरच थांबत नाहीत. त्यांच्या मते गेल्या ५०० वर्षात जागतिक स्तरावर होत असलेले हे तिसरे सत्तांतर आहे. पंधराव्या शतकात पश्चिम यूरोपचा उदय झाला. त्यानंतर १९ व्या शतकाच्या अखेरीस अमेरिकेचा उदय व्हायला सुरूवात झाली. जागतिक अर्थव्यवस्था, राजकारण, शास्त्र, संस्कृती या सगळ्यावर अमेरिकेचा पगडा दिसू लागला. आणि चीन, भारत आणि इतर विकसनशील देश प्रगतीची घोडदौड करत असताना आता परत एकदा तिस-यांदा जागतिक स्तरावर सत्तेच्या समीकरणात बदल होतोय असे त्यांचे म्हणणे आहे. या परीस्थितीकडे अमेरिकेने गंभीरपणे पाहिले पाहिजे असे त्यांना वाटते. केवळ लष्कराबाबत आपण सर्वांच्या पुढे आहोत त्यामुळे जगात खरी सत्ता आपलीच आहे या भ्रमात अमेरिकेने राहू नये असे त्यांना वाटते. केवळ लष्कराच्या संख्येच्या बळावर सत्ता कायम रहात नाही असे ते इंग्लंडचे उदाहरण देऊन पटवायचा प्रयत्न करतात. त्यांचे नवे पुस्तक पोस्ट अमेरिकन वर्ल्ड याच विषयावर आहे. पोस्ट सोविएट काळात सुरू झालेली त्यांची करीयर आता पोस्ट अमेरिकन काळाच्या विचारापर्यंत येऊन पोचली आहे. सोविएटनंतरचे जग ते अमेरिकेनंतरचे जग असा त्यांचा हा वैचारीक प्रवास आहे.