हेमंत करकरे गेल्यामुळे समाज म्हणून आपले नेमके काय नुकसान झाले आहे ते कळायला खूप वेळ लागेल. अनेकांना कदाचित ते कधीच कळणार नाही. कारण हडेलप्पीकरता प्रसिध्द असलेल्या पोलीस खात्यातील अश्या अधिका-यांचे नेमके वेगळेपण कशात असते, त्यांची वैशिष्ट्य काय असतात, त्याचा समाजाला नेमका उपयोग काय हे जाणून घेण्याची, त्याचे कौतूक करण्याची, त्याला उत्तेजन देण्याची संवेदनशीलताच आपल्यातले अनेक जण त्यांच्या स्वभाववैशिष्ट्यांमुळे वा राजकारणामुळे हरवून बसले आहेत.
आणि ही संवेदनलशीलताच करक-यांनी विविध पातळ्यांवर, अगदी पोलीस अधिकारी म्हणूनही, नेमकी आयुष्यभर कायम जपून ठेवली होती. मालेगाव स्फोटांच्या तपासामुळे त्यांच्यावर आणि त्यांच्या सहका-यांवर जी राळ उठवण्यात आली त्यांनी ते व्यथित झाले होते. पण तरीही त्याबद्दल बोलताना अगदी खाजगीतही त्यांच्या तोंडातून कुणाबद्दलही उणा वा वावगा शब्द कधी आला नाही. त्यांच्या मृत्यूपूर्वी आधीच्या शनिवारी रात्री ते माझ्या घरी गप्पा मारायला आणि जेवायला आले होते. पण तेव्हाही त्यांच्यातील ही सभ्यता आणि सुसंस्कृतता प्रकर्षाने जाणवली. जशी ती आमच्या संबंधात गेली २० वर्षे मला सतत जाणवत आली आहे.
१९८७ ला मी टाइम्स ऑफ इंडियाकरता वार्ताहर म्हणून ठाणे जिल्हा कव्हर करण्याकरता म्हणून गेलो. त्यानंतर काही महिन्यांनी करकरे बदलून ठाण्यात आले. त्यांचा माझी पहिली भेट झाली ती आयुक्त वाध्वा यांच्या कार्यालयात. कळव्यात काहीतरी पोलीस बळजबरीचे एक प्रकरण झाले होते आणि त्याची माहिती घ्यायला मी त्यांच्याकडे गेलो होतो. त्यांनी माझी करक-यांशी ओळख करून दिली आणि म्हणाले, ‘ही इज यूअर न्यू डीसीपी. आस्क हीम.’ करक-यांनी मला नंतर त्यांच्या कार्यालयात भेटायला सांगीतले.
काहीश्या अनिच्छेने ते मला केवळ आयुक्तांच्या सांगण्यावरून भेटले. परत भेटायचे नाही हे मनाशी ठरवत. हे पुढे त्यांनीच मला एकदा चांगली मैत्री झाल्यावर सांगीतले. आधीच्या ठिकाणी आलेल्या काही अनुभवांमुळे पत्रकारांशी संबंध ठेवायचा नाही असे त्यांनी ठरवले होते. पण त्यांच्या पदामुळे आणि घडणा-या घटनांनुळे त्यांना ते शक्य झाले नाही. परंतु ठाण्यातील अनुभवांनंतर त्यांनी आपले मतही बदलले.
एका खुनाच्या प्रकरणात काही माहिती देण्याकरता ऑफिस दिवाळीकरता बंद असल्याने त्यांनी मला घरी बोलावले. तेव्हापासून आम्ही जवळ आलो आणि बघता बघता कसे मित्र झालो ते कळलेच नाही. (आनंद नाडकर्णीने म्हटल्याप्रमाणे इतके मित्र होऊनही आम्ही कायम अहो जाहोवरच राहीलो, अरे तुरेवर कधीच आलो नाही हे आता जाणवते आहे. त्याचे श्रेयही त्यांच्याकडेच आहे. त्यांच्यापेक्षा मी वयाने, पदाने लहान असूनही त्यांच्या तोंडात माझ्याबद्दल कधीच अरे तुरे आले नाही. अगदी माझ्या पत्नीशी बोलतानाही ते अहोजाहो करत.)
पोलीस असूनही एकूणच वागण्यात सभ्यता आणि सुसंस्कृतता इतकी की आपण चक्रावून जावे आणि मार्दव इतके की आपण त्यांच्या व्यक्तीमत्वाच्या प्रेमातच पडावे. ते कायम अतिशय हळू आवाजात शांतपणे बोलत. कोणत्याही अर्ग्युमेंटमध्ये कधीच त्यांचा आवाज वर गेलेला मी बघितला नाही (फक्त आरोपींशी बोलताना सोडून). फारच एखादा मुद्दा पटला नाही तर, तुम्ही असे कसे म्हणता, यापलीकडे त्यांचे शब्द कधी जात नसत. मला तर वाटते की मी त्यांच्याशी वाद घालताना ते आपले मित्र आहेत म्हणून खूपच स्वातंत्र्य घेत असे. पोलीस खाते, आयपीएस अधिकारी यांच्याबद्दलची माझी मते जणू काही तेच या सगळ्याला जबाबदार आहेत अश्या पध्दतीने अरेरावीने मांडत असे. पण त्यांचा कधीच तोल जात नसे, आवाज चढत नसे. ते सभ्यपणे माझे काही मुद्दे मान्य करत. काही बाबतीत त्यांचे मते मांडत. पण वादविवादातील सभ्यपणा सोडत नसत.
त्यांच्या निस्पृहपणाबद्दल खूप लिहून आले आहे. खरोखरच हे वैशिष्ट्य सध्या सरकारी अधिका-यांमध्ये दुर्मिळ झाले असल्याने त्याचे कौतूक होणे स्वाभाविक आहे. त्यांच्या धैर्याबद्दल तर आता बोलायलाच नको. बलीदान करूनच त्यांनी ते सिध्द केले आहे. पण त्याहीपलीकडे जाऊन त्यांच्यात अनेक गुण होते, एक पोलीस अधिकारी म्हणून आणि माणूस म्हणूनही. विविध प्रकारच्या माणसांना आपल्याकडे आकर्षित करण्याची एक कला त्यांच्याकडे होती. तरत-हेची अशी अनेक माणसे त्यांनी आपल्याभोवती जमवली होती. अर्थात असे असले तरी आपल्या पदामुळे या बाबतीत ते खूप जागृतही असत. कोणीही नवीन माणूस संबंधात आला की ते आमच्यासारख्या मित्रांकडे तो कसा आहे याबद्दल चौकश्या करत आणि खात्री पटली की मगच त्याला त्याला आपल्या मित्रपरीवारात सामील करत. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अंत्यदर्शनाला वा त्यांच्या कुटुंबीयांच्या सांत्वनाकरता विविध क्षेत्रातील जी प्रचंड संख्येने जी माणसे आले होती ते बघितल्यावर त्यांनी नेमके काय कमावले होते त्याची कल्पना येते.
अनेक नवनविन गोष्टींबद्दल कुतुहल, त्या करून बघण्याची इच्छा हे करक-यांचे दुसरे वैशिष्ट्य. आणि आपल्या प्रचंड कामाच्या रगाड्यातही ते या सगळ्याकरता वेळ काढत. एकदा माझ्यासमोर आणि माझ्या एका मित्रासमोर एक भव्य डिपार्टमेंट स्टोअर सुरू करण्याची कल्पना मांडली. अर्थात त्यांच्या अश्या सर्व भव्य योजनांसमोर आम्ही मित्रच खुजे ठरायचो आणि आम्हाला काही जमायचे नाही. आमच्या अश्या भव्य भव्य योजनांवरील चर्चांमुळे आमच्या दोघांच्याही बायका काहीवेळा आमची गंमतही करत. पण त्यांचा उत्साह कमी होत नसे. नवनव्या गोष्टींमधला रस इतका की जाहीरात एजन्सी चालवणा-या माझ्या एका मित्राला एका जीन्सच्या आणि विडीच्या जाहीरातीचे काम मिळाल्यावर जणू काही ती आपलीच एजन्सी आहे आणि आपल्यालाच काम मिळाले आहे अश्या प्रकारे त्या कँपेनवर ब्रेन स्टॉर्मिंग करण्याकरता त्यांनी एक अख्या रात्रीचे सेशनही आयोजित केले आणि त्यात उत्साहाने भाग घेतला, कल्पना सुचवल्या. त्यातील त्यांचा रस म्हणजे यानिमित्ताने काहीतरी क्रिएटीव विचार करायला मिळतो. एकाच वेळी अनेक गोष्टीत संचार करण्याची आपली मनापासूनची इच्छा ते मला वाटते या पध्दतीने त्या त्या लोकांमध्ये मिसळून, त्यांच्या कामात रस घेऊन, चर्चेत भाग घेऊन भागवीत असत. चंद्रपूरला असताना चित्रकार, व्यंगचित्रकार मनोहर सप्रे यांच्यापासून प्रेरणा घेऊन त्यांनी बनवलेली उत्कृष्ट काष्टशिल्पे त्यांच्यातील कलाकाराची आणि त्यांना अनेक विषयात असलेल्या रूचीची साक्ष आहेत.
नव्यानव्या गोष्टींमधे रस असल्यामुळेच त्यांना अनेकदा पोलीसची नोकरी सोडून देण्याची हुक्की येई. पण ती अवस्था तात्पुरती असे. त्याबाबत ते चर्चा करत आणि ते करत असलेले काम कसे आणि किती महत्वाचे आहे हे त्यांना पटवले की तो विषय बंद होई. पण तरीही आपल्याकडून (नेहमीचे ड्यूटीचे काम सोडून इतर काही) जे आणि जेव्हढे मोठे काम व्हायला हवे तसे होत नाहीये असे वाटून त्यांना मधेमधे डिप्रेस्ड वाटे. सतत उत्साहाने आणि आनंदाने नवनवीन काम करणा-या आपल्या काही सहका-यांचे त्यांना खूप कौतूक होते. सुरेश खोपडे हे त्यापैकी एक. कुठेही गेले, कितीही अन्याय झाला तरी ते खचत नाहीत आणि जेथे जातील तेथे नवीन काहीतरी करतात ह्याचे त्यांना खूप कौतूक होते. (असेच कौतूक त्यांना अनिल अवचट यांचेही वाटे.)
एकूणातच कुठच्याही काहीही छोट्या कर्तृत्वाबद्दल त्यांना कौतूक असे. मुख्य म्हणजे कोणीतरी आपल्या पुढे जाईल अशी भीती त्यांना नसे. याचे एक महत्वाचे कारण म्हणजे अनेक गोष्टीत मनापासून रस घेत असतानाच आपल्या कामावरती असलेली त्यांची पकड. त्याकरता त्यांना खूप वेळ द्यावा लागे आणि काम व छंद यांच्यात समतोल राखताना त्यांची खूपच धावपळ होत असे. परीणामी मित्रांना, परीचितांना आणि घरच्यांनाही दिलेल्या वेळा ते अनेक प्रसंगी पाळू शकत नसत (माझ्याकडे ते नेहमीच सांगीतलेल्या वेळेच्या एक दीड तास उशिरा येत, पण शेवटच्या भेटीच्या वेळी कधी नव्हे ते सांगीतलेल्या वेळेच्या आधी आले होते.). पण तरीही दोन्ही गोष्टी ते मनापासून करत.
आर्थिक गुन्हे विभागाचा कार्यभार संभाळू लागल्यावर एका मोठ्या शेअर ब्रोकरला भेटून त्यांनी एकूणच शेअर्सचा व्यवसाय समजावून घेतला होता. दहशतवाद या विषयावरची काही चांगली पुस्तके त्यांनी गोळा केली होती. मुंबईत उपायुक्त असताना विविध पोलीस ऑफिसेस आणि आयुक्त कार्यालय यांच्यातील टपाल पाठवण्याच्या व्यवस्थेत बदल घडवून आणून त्यांनी या कामात वाया जाणारे मनुष्यबळ वाचवून ते इतर महत्वाच्या कामाकरता उपलब्ध करून दिले होते आणि ते ही तो विषय त्यांचा नसताना, त्यावर विचार करून, त्याकरता वेळ देऊन. जो विषय असेल त्यात खोलवर जायचे, मग त्याकरता कितीही वेळ द्यावा लागला तरी हरकत नाही हा त्यांचा स्वभाव होता. त्यामुळेच जातील दंगली हा विषयही आता केवळ स्थानिक राहीलेला नसून त्याला आंतरराष्ट्रीय संदर्भ कसा आला आहे आणि त्याकडे त्या़दृष्टीने कसे बघितले पाहिजे हे अलीकडेच त्यांनी एकदा संगतवार समजावून सांगीतले होते.
प्रत्येक गोष्टीच्या खोलात जाण्याच्या, त्याचा सर्व बाजूंनी विचार करण्याच्या त्यांच्या स्वभावामुळेच गुन्हे आणि गुन्हेगार यांच्या सामाजिक अंगाबाबतही त्यांना कुतुहल असे आणि त्यावर ते विचार करत. त्यांच्या या प्रकारच्या नॉन पोलीसी विचारसरणीमुळेच एकीकडे ते दहशतवादाचा मुकाबला करत असतानाच दुसरीकडे दहशतवाद्यांच्या मानसिकतेचा अभ्यास करत होते. त्यातून या मूळ प्रश्नावरच काही उपाय शोधता येईल का असा त्यांचा विचार असावा. रोगावर औषध देता देताच मूळ रोगाचा अभ्यास करून तो होऊच नये म्हणून काही करता येईल का असा त्यांचा नेहमीच एक विचार असे. या विचारातूनच अंमली पदार्थ विरोधी पथकाचे प्रमुख झाल्यावर अंमली पदार्थ विकणा-यांविरूध्द मोहीम चालवतानाच तरूण मुलांनी या व्यसनांकडे वळू नये म्हणून महापालिका शाळांमध्ये आयपीएच आणि स्त्री मुक्ती संघटनेच्या मदतीने त्यांनी जिज्ञासा प्रकल्प राबवला. (त्याविषयी डॉ. आनंद नाडकर्णींनी विस्ताराने लिहीले आहे.)
करक-यांचे वेगळेपण नेमके इथेच होते. अश्या वेगळ्या पध्दतीने विचार करणारे अधिकारी अपवादात्मक असतात. ते आपल्या विचाराने, कामाने, मेहनतीने समाजाच्या एका छोट्या भागात का होईना पण काही निश्चित बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करतात. त्याकरता वेळ देतात, वेगळा काही विचार करतात. त्यामुळेच त्यांच्या जाण्याने, पटकन स्पष्टपणे लक्षात आले नाही तरी एक समाज म्हणून आपले काहीतरी नुकसान झालेले असते. करक-यांच्या जाण्याने नेमके हेच झाले आहे असे त्यांना जवळून ओळखणा-या सर्वांचीच भावना असेल.
No comments:
Post a Comment